शोभा घरे यांची चित्रशैली

admin

ऑगस्ट महिना, नुक्ताच पाऊस सुरू झालेला. महेश्वर आर्ट कॅम्पचा पहिला दिवस. सर्वत्र हिरवळ आणि धुकं पसरलेलं.

मी आणि प्रिया मुंबई हून उशीरा पोहोचलो होतो. पुढचे चार दिवस विवीध स्वभाव, विचारसरणीच्या स्त्री चित्रकारांमध्ये रहायचे होते. मग काय .. धम्माल !
कोणी खोडकर, कोणी शात संयमी, कोणी मजेशीर, कोणी डोमीनेटींग…कोणी स्वता:च्या कामात तासंतास रमलेली..कोणी शिक्षिका, कोणी अॉफीसर तर कोणाची ओळख फक्त चित्रकार. सगळे सगळे वेगळे आम्ही साधारण वीसजणी आणि सर्वांमध्ये एकच साम्य की आम्ही कलाकार.

दुपारी कामाला सुरूवात केली. कॅनव्हास इजेलवर लावला आणि रेखाटन केले.. बास. मग वर्गभर फिरत असल्यासारखे दोन फेर्या मारल्या.
हो .. आमच्यासोबत प्रतिभा वाघ मॅम पण असल्यामुळे ते चार दिवस सतत आमच्या एल.एस.रहेजाची आठवण .. ते अल्लड आयुष्य डोळ्यासमोर होते.

संध्याकाळी सिरीयसली काम करू लागले. माझ्या डाव्या बाजूला वर्षा खरटमल काम करत होती. मला काम करताना उगाचच बडबड करायची सवय आहे. मग तिला हाक मारून प्रतिसाद नाही ..त्यावरून आठवायचे की तिला ऐकूयेतच नाही..पण ह्या गुणामुळे ती सतत तिच्या कामात चिकाटीने रमलेली असते. त्या कॅंव्हासला काय देऊ अन् काय नको बघत एकटक तेथेच रमून तिचे सुंदर आयुष्य गिरवत असते. मग मी आपली गालातल्या गालात हसून प्रीयासोबत काही कुजबुजून परत आपल्या जागेवर यायची.
माझ्या समोरच्या भिंतीला लागून हॉटेलच्या स्वयपाक खोलीची खिडकी होती. सकाळसंध्याकाळ आमच्याकरीता आत काय मेनू शिजतोय ते ती खिडकीच सांगत असे.

माझ्या उजव्या हाताला एक चित्रकार स्टूलवर कॅनव्हास आडवा ठेवून शांतपणे काम करण्यात रमलेल्या असायच्या.
मी त्यांना ओळखत नसल्यामुळे त्यांचे कामाकडे सुरूवातीला लक्ष दिले नाही. दुसर्या दिवशी संध्याकाळी हळूच डोकावले तर अतिशय प्रेमळ काहीतरी त्यावर उमटत असलेले दिसले. माझ्या मनातिल निसर्ग त्यावर हळूवार वसला होता.
त्यांच्या स्वभावाप्रमाणे … आपण आपले काम करत रहावे .. जगाच्या दिखाव्यात रमू नये हे सुचवत होते.

अरे देवा … मी ओळखते की ह्यांच्या चित्रांना .. काहीसे जुने पुराने आठवून गेले.
अगदी फिकट बैज रंगाचा वॅश, त्यावर डोंगराच्या आकाराचे काहीतरी पुसटसे जणू धुक्यातील चित्र आणि एखादा पक्षी नुक्ताच त्यावरून आकाशात झेप घेतोय..
कुठेतरी पाण्याचे प्रतिबींब, कधी झाडाचे असतित्व …कधी डोंगर जणू पाण्यात तरंगतोय…काल्पनिक ..रम्य.
पण हे सारे निसर्ग जीवन एक आभासच जणू. कुठेही भपकेपणा नाही का कुठेही मी पणाचे असतित्व नाही …
सर्वत्र एकसंघीक शांततेचे समाधानाचे निर्मळ अस्तित्व …. अगदी अगदी त्यांच्या स्वभावासारखे.

मी वर्गात .. माफ करा .. हॉलमध्ये कधीही उगवत असे. पाऊसाळी वातावरण असल्यामुळे मला ते वातावरण साद घलतय असे समजून उगाच एक फेरी मारून यायचा मोह आवरूच शकले नाही. आणि तसेही ते वातावरण म्हणजे आपल्या चित्रांसाठी एकप्रकारचे ग्लुकोज जणू.

सकाळी लवकर उठून एकटीच पंधरा मिनीटे चालत मंदीर, होळकरांचा राजवाडा आणि नर्मदा नदीकाठी फिरून येत असे. गल्लीतून येता येता हातमागाच्या साड्या दिसल्या की त्याच्या किमतींची विचारपूस करण्यात वेळ जातोच नै. मग नाश्टा करून वर्गनामक हॉल मध्ये माझ्याआधी बाकीचे शातपणे शहाण्या मुलींप्रमाणे कामाला बसलेले पाहून काना डोळा करत दारातूनच प्रिया .. हर्षदाला हाक मारत …त सर्वांची शांतता भंग करत व त्यातच प्रियाचा प्रेमळ टोंबणा ऐकत तिला साड्यांचे रंग ..किंमत हळूच कानात सांगायचे… व मग सकाळी सकाळी अनुभवलेले महेश्वर कॅनव्हासवर उमटवायला घेत असे.

मग अचानक हा उजवीकडचा कॅनव्हास दिसला आणि आपल्या अशा अल्लड वागण्यामुळे उजवीकडून ओरडा मिळायला नको म्हणून खबरदारी घेऊ लागले.
मग तिसर्या दिवशी माझा कॅनव्हासही वळवून ठेवला कारण ते उजवीकडचे चित्र इतके नितळ पारदर्शक वाटत होते की मी त्या चित्राच्या प्रेमात पडले. मग माझ्या चित्रातील काही त्यातल्या त्यात भडक पॅच चुकून आपले प्रतिबींब त्यावर टाकेल की काय अशी भिती वाटत असे. तर कधी माझ्या हातून रंगाचा शिंतोडा उडू नये ही भिती…
पारदर्शकपणा जपत ते रंग छटाही बदलत होते. कमी प्रतिकात्मक आकार पण किती किती साधेपणा आहे ह्यांच्या चित्रात… सर्व काही सकारात्मक. मग अशा वेळेस मी मी सकारात्मक ओरडत काही कलाकार भपकेपणाने भौतिक आयुष्य जपत आपले काम दाखवत फिरतात त्यांची अवर्जून आठवण येते. ही खरी सकारात्मकता.
हे रंग.. हे आकार उमटायला जे अनुभव गाठीशी बांधले असतील त्या सुखांची .. त्या जखमांची जाणिव ते चित्र करून देतात.
कित्येक दिवस . महिने ते तरल आकार ..पण खोलवर ठसा उमटवणारे… रंग .. आकार … मनात घर करून आहेत.
कलाकाराचे एकच काम खूप काही सांगून जाते. ते पुरेसे असते. मग त्यात मला काय सापडले ह्याचे काही आठवणींसकट येथे थोडक्यात वर्णन केले आहे.

शोभा घारेजी….
अतिशय बोलकी आहे तुमची चित्रशैली .. अगदी प्रेमात पाडणारी.
…… BhavnaSonawane.June2020

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Visit Us On FacebookVisit Us On InstagramVisit Us On Youtube