एका मित्राला लिहिलेले पत्र
एका मित्राला लिहिलेले पत्र
‘ गेली वीस वर्ष चित्र थांबली आहेत म्हणून सतत रडणार्या मित्राला लिहीलेले पत्र ‘
सतत रडत असतोस.
नोकरी ..घर ..बायको ..मुलं … सर्वच कसं छान आहे तरी चित्र काही जमेनात.
चित्र शिकला आहेस. गोल्ड मेडल मिळवल आहेस ..एक वर्ष मेरीट मिळवलयस …
पण कित्येक वर्ष चित्र जमत नाहीय …. पुरेसा वेळ नाही हे कारण देतोस ..हे अगदीच खोटय …
जो वेळ आहे त्या वेळेतही मेंदूसोबत भुसा भरून ठेवला आहेस.
देवावर तुझा विश्वास नाही ..नसूदे ..कदाचीत विश्वास असता तर एकाग्रता समजवायला सोपी झाली असती ….पण असो…
पं जसराज ..किशोरी अमोणकर ..पं. भीमसेन जोशी …जगजीत सिंग … शंकर महादेवन … वगैरे ऐक. सुफी काही ऐक . संपुर्ण स्टुडीओत ते नाद घुमू देत. हो पण हा अनुभव एकट्यानेच घे …
मी ब्लॕंन्क झाले की ह्यांची कृष्ण ..मिरा …विष्णु …विठ्ठल स्तोत्र …भजन ..स्तुती ऐकते.
त्याकरीता स्टुडीओत चांगला स्पीकर असतो … हल्ली मी स्टुडीओत आहे हे शेजारच्यांना त्या भजनांवरून समजतं ..
एक पंचहात्तरीला आलेली म्हातारीही दाराबाहेरच्या जीन्यात मी दार उघडायची वाट पाहत दुपार संध्याकाळ घुटमळताना दिसते.
मी अजून आत बोलावले नाही तिला कधी .. मला भिती आहे .. तीही माझ्याप्रमाणे कधी स्वप्नमय व्हायची ….
तर.. सतत ऐकत रहा …तासन्तास ..जे आवडेल ते ..
समोर पेपर ..कलर … कॕनव्हास .. फक्त मांडून ठेव…पाहत रहा … तेथेच लोळत पड ..
काम करायला घेऊ नकोस पण त्या पांढर्या शुभ्र चौकोनी आकारावर एक ..अनेक स्वप्न पहा … तेथेच झोप थोडावेळ ..एक छान डुलकी घे …
पुनः तो आकार न्याहळत बस ..तासन्तास ..
तरी काम करू नकोस.
असे काही दिवस कर …हळूहळू इतर विचार बाहेर पडतील …
हळूहळू अनावश्यक स्वप्नही चाळणीतून मोकळी होतील आणि तुला तुझी खरी स्वप्न ..विचार सतत तेथे दिसत राहतील. ती काही काळ सोबत देतील अशी असतील.
आता ती स्वप्न सोबत ठेव . ती तेवढीच पुरेसे आहे ..एक अख्खी सिरीज घडवण्याकरीता… कदाचीत पंचवार्शीक काय ते ..असतं नै …त्याप्रमाणेही टिकतील …
किंवा कदाचीत आयुष्यभर पुरेल …असंही काही असेल त्यात.
माझी स्वप्न मात्र साधीच असतात … तरी माझ्या चंचल मनाप्रमाणे सिझनल असतात हं … मग तो कॕनव्हास सिझन प्रमाणे बदलला तरी पुढच्या सिझनला वळून नव्यासोबत जुनाही पुर्णत्व अनुभवतो …
जेथे जेव्हा ऊन असतं तिथे ऊन्हाळा हवा …पावसात जणू ओलंचिंब व्हावं ..नाचत रहावं एखाद्या मोराप्रमाणे.. थंडीत गारगार वातावरणात एखादं लाल भडक परकर पोळकं नेसून लहानगं होऊन धावत सुटावं त्या धुक्यात डोंगरावर …
लक्षात असू देत ..ही माझी स्वप्न आहेत ..तू तुझी पहा ..उगाच स्वतःची स्वप्न समजून उचलगिरी करू नकोस हं ..
हे आकार असतात स्वप्नात …अंतरमनात ..
पण तुझ्या कॕनव्हासवर उतरताना ते आकार बांधून ठेऊ नकोस.
मात्र ते रंग उतरतील ..ते भाव उतरतील …तो कानाला सतत ऐकू येणारा एकच नाद असेल कदाचीत …तेथे आकार नसूनही संपुर्ण चित्र कोणालातरी खोलवर त्याच्याच आंतरमनात घेऊन जाइल …कदाचीत.
हे सतत करत रहा ..
तासन्तास ..दिवसेन्दीवस ..वर्षोन्वर्षे .. मग थांबणे शक्य होणार नाही मधली वीस वर्षे जणू जगायची राहिली होती तीही एकत्रीत जगशील …. आयुष्य नक्की वाढेल.
आणि हे असे सोपे काही जमणार नसेल तर फक्त नोकरी सांभाळ … आयुष्यभर झीज … चित्रांचा विचार सोड.
……©Bhavna Sonawane.dec. 2019.