1995 या वर्षी चित्रकलेचे शिक्षण घेत असताना ….
1995 या वर्षी चित्रकलेचे शिक्षण घेत असताना सैयद हैदर रझा (1922-2016) ह्यांच्या चित्रांशी ओळख झाली ..
नेहमीप्रमाणे वर्गात मोकळया वेळेत आमच्या सरांनी आम्हाला हाताळायला पुस्तकं आणली असावीत.
रझा तेव्हापासूनच माझ्या आवडत्या चित्रकारांपैकी एक.
जेव्हा जेव्हा एखादं चित्र समोर आलं .. तेव्हा तेव्हा तासन्तास मन एकाग्रतेने त्यात काही शोधत राहीलं …
भुमिती आयुष्यभर पुरवली ह्या माणसाने आणि आपल्यालासाठीही सोबत भरभरून प्रश्न निर्माण केले.
चित्र हे असेच असते का?
चित्र असे असावे का?
बरं … इतके सोप्पे कसे काय बरं … तरीही कसली ही ओढ? नेमके काय सांगायचे आहे त्यांना त्यांच्या चित्रांमधून?
एवढे सोप्पे निरागस आकार … तरिही अपुर्ण का बरे वाटत नाहीत?
इतकी सहजता की चित्रांची व्याख्या न अडखळता कलेच्या मुलभूत तत्वांसकट आपल्याकडून वधवून घेतात रझांची ही चित्रे.
पुर्वी कॉलेज लायब्ररीत डोळे भरून पाहिलीत.
त्यादर्म्यान जहांगिर कला दालनात त्यांच्या चित्राचे एकल प्रदर्शनही झाले होते. ..मग काय .. ‘ चेरी ऑन टॉप ऑफ द केक ‘ जणू !
मग दोन दिवस दालनात जाऊन सर सांगायचे त्या प्रमाणे चित्रांमधील राजस्थान शोधशोध शोधले. बरं … रंग तर आहेत की राजस्थानी … होऊ कधी रंगीत प्राणि टाइप्स !!
मी त्या काळात राजस्थान आणि लमाणि हे विषय वाचायला ..पहायला मिळाले की तासन्तास गुंग होत असे.
आता ते अधूनमधून काळा गोलाकार .. शुन्याकडे नेणारा ‘बिंदू’ नामक चित्र आहे ते नेमके काय असावे? बराच वेळ समोर उभे राहून न्याहाळले. खूप वेळ चित्र न्याहाळणे खरेतर मला कधीच जमले नाही. आजही काही ठराविक चित्रकारच त्यांच्या कले द्वारे मला असे खेचून आपल्या कलाकृतीसमोर सोबत उभे करीत असत.
फाऊंडेशन, पायाभूत अभ्यासक्रम वर्गात नुकतेच तात्विक दृष्ट्या रंग उधळायला शिकत होतो … आणि असे असंख्य रंग पृष्ठावर एकसाथ उधळणे म्हणजे आमच्या भाषेत जाम डेरीग असते.
हळूहळू जसजसे कलेच्या पदवी कडे पुढे सरकतो तसे चारपाच वर्षात असंख्य विचार.. वेदना.. लोभ .. प्रेम .. मत्सर .. आनंद .. रडगाणं .. त्या कागद, कॅनव्हास , मातीत दुमीत व त्रिमीत स्वरूपात उतरवायला घेतलेले असतात.
फार पुर्वी तामिळनाडूत एका आर्ट गॅलरीच्या गेस्टरूम मध्ये आठ दिवस राहीले होते. रोज कुठेतरी फिरायला जात असे . माझे चित्र प्रदर्शन सुरू होते तेथे. गॅलरी प्रायव्हेट असल्यामुळे मी तेथे थांबून राहणे योग्य नव्हते. मग दिवसभर फिरायचे. मामल्लपुरमला पंच रथ, शोअर टेंपल. टयगर केव्ह, मरीना बीच, नॅशनल म्युझीयम, पोर्ट म्युझियम, गिंडी पार्क, चोलामंडल, विजीपी इ. करत दिसेल त्या मंदीरात जायचे… अचंबित करणारी कलाकुसर पहायची. इतके सुंदर काळ्या दगडात कोरलेल्या मुर्त्या की देवी देवतांयाच्या प्रेमात त्या काळात पडू लागले. दाक्क्षिणात्य शिल्पपद्धत व द्रविड मंदीरे माझी तेव्हापासून आवडती झाली.
संध्याकाळ झाली की थकून रूम मध्ये परतायची. आणि तेव्हा साथ होती ती एका सात बाय सात फूट भिंतभर पसरलेल्या कॅनव्हासची.
त्या खोलीच्या भिंती आतून टिपीकल टेराकोट्टा कलरच्या… लाल मातीच जणू. एक पलंग .. शेजारी टेबलवर एक मराठी साजश्रृंगारातली साइड व्यूह मधील छोटे जलरंगातील पोर्ट्रेट. कदाचित हळदणकरांचे असावे ते. बाथरूम मध्ये एका बाजूला हसैन चे ड्रॉईंग. हे सगळे ओळखिचेच की .. आणि चक्क आठवडाभर डोळ्यांसमोर होते. आणखी बरेच काही होते त्या खोलीत पण माझे लक्ष ह्या तिघांवरून सरलेच नाही.
तो एक भिंत व्यापलेला रझांचा कॅनव्हास अन्फ्रेम्ड होता. शरण … तिच्या सर्व घरांची,. खोल्यांची ही खासियत. सर्वत्र जमीनीशी नाते जोडलेले दिसते. कुठेही प्लास्टीकचा फील नसतो. साध्यात साधे जगणे तरिही महागडे जगणे हे तिच्याकडून शिकायला मिळाले. जिथे जाइल तेथून प्रथम पुस्तके खरिदी करायची व भरभरून फिरायचे व कला दालने आवर्जून पहायचे. बाहेर फिरताफिरता तहान भूकेचा जास्त विचार करायचा नाही. जेवण काय … आयुष्यभर करायचे आहे. ते क्षणिक असते. जिथे छान खायला मिळेत ते मनसोक्त खायचे. आर्टीस्टची फाइव्ह स्टार ची बिलं भरतभरत ठराविक शहरातील ठराविक टपरीवर चांगले सॅन्डविच .. उत्तम ढोकळा इ. मग कमी वेळेतच गाडी फिरवून मुंबईतील फेमस अळुवडी कुठे मिळते हे देखील मनसोक्त अनुभवायची तिची सवय…स्वत: डयेट करत इतरांना भरभरून खाऊ घालणे तिला आवडते. तिचे डाऊन टू अर्थ वागणे … नेहमी जाणवत राहते. तिने तिचे जुने पुराने लाकडी कपाटेही आजवर जतन केले आहेत. मोठमोठे चित्रकार तिच्या हातून घडले आहेत, घडत आहे. मी ही त्यातलीच एक.
ती खोली, तिच्या घराचा एक भाग होता. तिच्या त्या खोलीत रझाच्या पेंटींगने संपुर्ण भिंत व्यापलेली होती. त्यापुर्वी पाहिलेल्या भडक रंगांपेक्षा हे खूप वेगळे चित्र होते. एक तरल … खूप खूप फिकट बैज , जवळ जवळ रंग नसलेल्या रंगाचे रझांचे पेंटींग होते.फाऊंडेशन, पायाभुत अभ्यासक्रमात कधी काळी केलेरी टींट, टोन, शेडची असाइनमेंट आठवली. मग त्यात मास्तर ओरडून ओरडून सांगत समजावत होते ..” बघा ..बघा … हेच ते .. ते टींट टींट म्हणतोय ना मी ..ते हेच शुभ्र.. शुध्द तरिही रंगांची झलक देणारा एक प्रकाश …तो लाइट टींट इतका लाइट जमलाच पाहिजे ..मगच तुमची ग्रे स्केल पुर्ण होइल”. कानामागे पुर्वी जे.जे.स्कूल अॉफ आर्ट मध्ये प्राध्यापक रमेश कांबळी सर जणू ओरडत ओरडत सांगत होते. मी पुर्वी कधीतरी दोन महिने त्यांच्याकडे विलेपार्लेच्या घरातील क्लासमध्ये चित्रकला शिकले होते.
हा रंग इतका फिकट, इतका तरल की ते पाहून मनाचे समाधान होतच नव्हते. रंगांमध्ये खेळल्याप्रमाणे आपण चित्र खेळतो. पण हे समोरचे चित्र त्या खेळाला शिस्त लावणारे होते. आडव्या ओबडधोबड रेषांनी संपूर्ण सात बय सात चा अवकाश .. मोती , आयवरी, बैज, कधी थोडा केशरीकडे सरकणारा तर कधी पवळसर तर मधूनच एखादा हिरवट फट्कारा .. बहुदा तैलरंगातील चित्र असावे. होरायझन … समुद्र काही चितारलेले नव्हते पण ते चित्र मला एखाद्या सागरात नेऊन सोडायचे व मी सकाळ होइस्तोवर तेथेच हरवलेली असायचे.
एक वेगळीच शांतता आहे त्यांच्या चित्रांमधे ..
बिंदूचेही तसेच. कालांतराने रझांचा तो बिंदू खूप आवडता झाला. तो सहज व्यक्त झालेला भारतीय बिंदू परदेशातही भलताच आवडू लागला.
it takes the mind to an infinite level …
जिथे सुरूवात अन् शेवट एकच भासतो ..
असा हा एक बिंदू !
प्रोग्रेसीव आर्टिस्ट ग्रूपची चित्रे कळत नकळत आजही आपल्याला चित्राची अभ्यासरूपी दिशा दाखवत राहतात.
मी आठवडाभर ते चित्र नकळत अभ्यासले. मग कदाचित त्यामुळेच हळूहळू रंगांतील भपकेपणा मला नकोसा वाटू लागला असावा.
अधूनमधून एकल व ग्रूप प्रदर्शने होऊ लागली. मध्यंतरी रंग नकोसे झाले आणि पांढरा रंग खावा तसा खूप खूप फिकट रंगांमध्ये काही वर्ष काम केले …
आणि त्यादर्यम्यान दोन चॅरिटी शोच्या निमीत्ताने हुसैन , रझा , अंजली इला मेननसोबत माझेही चित्र झळकले ह्याचा अभिमान व त्याहून अधिक आनंद.
आज सैयद हैदर रझा , S.H.Raza यांची पुण्यतिथी आहे.
………….. भावना सोनवणे.