जगण्यातील एका वर्तुळाच्या टोकाला सगळं शुन्य

admin

कित्येक वर्षे काम करतेय … कित्येक वर्ष सातत्याने काम करतेय. घरच्यांची साथ लागते .. ती वेळोवेळी मिळत राहीली.
जगण्यातील एका वर्तुळाच्या टोकाला सगळं शुन्य … त्या शुन्यातून सुरूवात केली.
गिरक्या घेत आजवर येथे पोहोचले…. अजून अर्ध वर्तुळ शील्लक आहे. कलेमुळे माझ्या जगण्याला जीवंतपणा आहे.

बारावी सायन्स पुरते मांबाबांसाठी शिकले.
त्यानंतर चित्रकला पदवी स्व:च्या जिद्दीने आणि मेरीट मिळवले. डिप्लोमा इन आर्ट एज्युकेशन ही मेरीट मध्येच. महाराष्ट्रात चौथी तर मुलींमध्ये पहिलीच होते. ते चार पाच वर्ष शिक्षकांची शाबासकी भरभरून मिळाली. शिक्षकांनी मित्र मैत्रिणींनी जगणं संभाळून घेतल …व लग्नानंतर अनिशने.

शिक्षण होता होता लग्न ही केले. मेरीट मिळवता माझा मोठा लेक अथर्व जन्माला आला. अगदी मोजून मापून श्वास व अन्न शरीरात बसावं तसं जगणं सरत गेलं. बाळ झोपले की छोटे छोटे चित्र पुर्ण केले. पॉल क्ली म्हणाला होता नै … ” छोट्या छोट्या गोष्टी एकत्र करायच्या … मग जमा झाले की काहीतरी भव्य तयार होतं … “
हे शेवट परियंत लक्षात राहील. असे छोटे छोटे .. पन्नासेक चित्र बनवली.
अथर्व दोन वर्षांचा असताना आर्ट प्लाझाला शो केला आणि तेरा हजार रूपयांची चित्र विक्री झाली.

शिक्षण घेता घेता खूप कला दालनं एकटीने फिरायची. आठवड्यातून पाच दिवस लायब्ररीत आवडीच्या कलाकारांची पुसतकं चाळायची. नंतर कला शिक्षीका म्हणून करंदीकर कला अकादमी येथे रूजू झाले आणि खूप आनंद वाटू लागला. डिझाईन सोबत थियरी शिकवायलाही आवडायचे. पण तेथील काही गाऊंढळ विचारसरणीचे शिक्षक डोक्यात गेले अन् 2006 साली पुन्हा कधी शिक्षकी पुर्ण वेळ पेशेत यायचे नाही असा निर्णय घेऊन चित्रांमध्ये रमले.

त्या दरम्यान दोन एकल शो झालेले आणि चित्र विक्रीही सुरू झाली.
एकत्र कुटूंब एकत्र ठेवून स्टुडीओ वेगळा थाटता आला. चित्रांची मागणी वाढली.

तेव्हा माझी नॅशनल .. स्टेट … आर्ट सोसायट्यांना चित्र पाठवली की रीजेक्ट होत असत. रिजेक्ट झालं की डोळ्या समोर मुकूंद गावडे सर .. प्रतिभा वाघ मॅडम … शिरीश मिटबावकर सर … भिसे सर … जगताप सर यांचे कोतूकाच्या नजरेने पाहणारे चेहरे समोर दिसत असत. अगदी गोंधळ होत असे. काय खरं … काय खोटं … तेव्हा समजेनासे होई. त्यामुळे चित्र पाठवायचे थांबले. इतकंच काय .. जहांगीर आर्ट गॅलरी ने आजवर दोन वेळा माझा अर्ज रिजेक्ट केला. मी मुंबईची असून आजवर एकही सोलो किंवा ग्रूप शो जहांगीर कला दालनात झाला नाही. रिजेक्शनची इतकी सवय झाली की पुढे गरजच वाटली नाही.

पाच वर्ष फक्त चित्र करत कंटाळा येवू लागला. बदलापूरहून ट्रेनने प्रवास करून सगळे शो पहायला जमायचे नाही.

काही काळ युरोप मध्ये राहण्याची संधी मिळाली अन् माझ्या विचारांना नेमकी दिशा मिळाली. त्या काळात नवीदिल्ली व तामिळनाडूत अनेक शो हौऊ लागले. आर्थिक स्थैर्य लाभलं. स्व:ताचा स्टुडीओ व घरही झाले. प्रायवेट गॅलरी तर्फे युरोप मध्ये तीन महिने वास्तव्य व काही ठराविक कलाकारांसोबत कला अभ्यासानिमीत्त टूर. खूप कौतूक झाले. हे देखील स्वप्नमय होते. जेथे जाईन तेथे लिंबूटिंबू होते. त्यामुळे भरभरून कौतूक होत असे आणि नवीन ओळखीच्या चेहर्यावर प्रश्नचिन्ह. भारताच्या बाहेर राहून बाहेर भारतीयांबद्दलचे प्रेम .. आदर जाणवला व तसेच काही खालच्या विचारसरणीचे भारतीय पुरूष बाहेर जाऊन किती किळसवाणं वागतात … उगाचच एकट्या स्त्रीला बिचारी समजतात … ते ही दिसले.
तेव्हा कलाकारांना भेटायचा कंटाळा येऊ लागला. भारतात परतल्यावर माझीच बददलेली विचारसरणी … मी स्वत:चा अभ्यास करू लागले. मग माझ्या शैली विषयी चांगल्यावाईट गोष्टी स्वीकारत राहीले. हृया काळात कलाकार मित्रमैत्रिणी नव्हे पण गॅलरी क्युरेटर कडून खूप काही शिकले.

हळू हळू माती हाताळायला शिकले …. मेटल काम शिकू… सराव करू लागले. फर्नेस घेतल्या. जेव्हा माझ्या सोबतीचे कलाकार कला क्षेत्रात मैत्री वाढवत होते तेव्हा मी काहीतरी नवीन घडवण्याच्या प्रयत्नात धडपडत होते. फेसबूकवर माझ्या वॉलवर आनंदीआनंद दरवळत होता. माझ्या बद्दलची कुजबूज अशी होती की … भावनाला सगळे रेडीमेड मिळाले आहे. असो …
आम्ही येथे पसारा वाढवत होतो. आता एवढा पसारा वाढला की पसार्यात जगणे आलेच की. जेथे जशी होते … त्यात सुख होते … आहे .. आणि राहणार. आणि कला निर्मिती सारखे दुसरे सुख नाही.

बरं … हे पसारे करता .. आवरता … एकदा ते कलाकारांमध्ये वावरणंच विसरले. नॅशनल .. स्टेट .. आर्ट सोसायट्याला चित्र पाठवायला विसरले…. पंधरा वर्षं अशीच सरली. आता गेल्या बावीस वर्षांत नवं नवं करत पुन्हा जुन्या कडे जावं वाटतं …पण माझीच ती शैली मागे राहीलय असं जाणवतं तरी काम करायची प्रेरणा देत राहतं ….

आता लक्षात येते की आता तो कलाकारांमधील वावर .. त्यांची हांजी करणं टाळले अन् मला इतर कलाकार ओळखेना …
मला पुरस्कार नाहीत .. कारण पुरस्कार गोळा करायची गरज वाटली नाही.
पण अवतीभवती पाहता लक्षात येतंय की कलाकारांना जग ओळखतय ते पुरसकारांवरून.
खरंच … भेटीगाठी आणि त्यातून जन्मलेले किंवा विकत घेतलेले पुरस्कार एवढे महत्वाचे आहेत का ???
शुन्यातून अनेक स्त्रीया जग निर्माण करत असतात … आदराने त्यांच्या बाजूने उभे राहीले की काही लोक इतरांच्या कानात कुजबूजतात … खरंच किती किळसवाणं आहे हे सर्व….
मला कित्येक वेळा बायोडेटा वाचा आणि मग बोला हे समोरच्या माणसाला सांगावे लागते. हे मजेशीर वाटले तरी आता वेळ आली की ठणकावून सांगायला शिकले आहे.
स्त्री-पुरूष समान दर्जा वगैरे सब झूठ है. कित्येक भलतेच पुरूष आजही स्त्रीयांच्या कपड्यांवर .. त्यांच्या ब्युटी पार्लर खर्चावर चारचौघात चर्चा करताना दिसतात. शेवटी त्यांचे सलून ते आमचे ब्युटी पार्लर …. काय फरक आहे ! अरे सुंदर आणि वयाने लहान दिसणं .. नटणं .. आमचा अधीकार आहे. मग त्या सुंदरतेवर शंका का घ्यावी …
सोपं नसतं … असं आपलं जग शुन्यातून उभं करणं …..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Visit Us On FacebookVisit Us On InstagramVisit Us On Youtube