‘ जन्म आणि भोग ‘ …
जन्म आहे तर त्यासोबत सुखदु:ख आलेच. कधी प्रवास सोपा तर कधी खडतर.
भागवत गितेत जगण्याविषयी अशी काही उदाहरणं आहेत जी जगणं सुलभ करते. प्रत्येकाच्या आयुष्यात कमी अधीक प्रमाणात चढउतार असतात ते गीतेत म्हट्ल्या प्रमाणे ते त्यांच्या पुर्व कार्यांमुळेच. तसेच प्रत्येक पापाची परतफेड, काही देवाण घेवाणी त्याच जन्मात फेडायचे असते व उरले सुरले पुढच्या जन्मी भोगायला येते. गीतेवर श्रद्धा नसली तरी नुकसान काही नाही. कारण मग माणूस निश्चीत पुण्याई कडे वळू लागतो. आपल्या सोबत काही वाईट झाले तर मी काहीतरी पाप केले असावे म्हणून मला दुःख भोगावं लागतंय आणि हे प्रायश्चीत असून भोग लवकरच संपतील हे भोगणे सोपे करून जातात. पण तो भोगतोय .. भोगूदेत असं म्हणून एखाद्याचा अधीक छळ करणे हे क्रूरच.
एखादी गोष्ट आपली म्हणून स्वीकारणं आणि दुसर्याची श्रीमंतीवर जळफळाट होणं .. हे देखील चूक. कारण तो त्याचे नशीब घेऊन आला आहे हे विसरू नये. प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात त्या प्रमाणे एखादा सुखी इतर काही बाबतीत दु:की असतो पण ते आपल्याला दिसत नसते.
फेसबूकवर आनंदीआनंद भीरभीरणारी माणसं त्यांच्या वैयक्तीक जगण्यात सुखी असतातच असे नाही. मग नकळतच त्यांच्या त्या जगण्यावर जळून आपण त्यांचे भोग आपल्याकडे ओढावून घेतो. तो त्याच्या नशीबाने सुखी आहे हे बोलून विचार सोडता आले पाहीजे. शाळेत खूप अभ्यास करतो तो पहिला येतो तसेच आहे जगण्याचे ही. आपल्या कडे सात जन्म ही संकल्पना खूप सुंदर पद्धतीने मांडलेली दिसते. मग अरे आपले आयुष्य संपले .. आता काही उरले नाही असे म्हणत जगणेच नाही.
अगदी लहानपणी अभिनेत्री वहायचे स्वप्न पहायची. ते पुर्ण होणे शक्यच नव्हते. नंतर नृत्य शिकायचा प्रयत्न केला. सतत कोणी न कोणी .. काही न काही आडवे आले. शेवटचा आवडीचा एकच पर्याय, चित्रकला क्षेत्र निवडले.
मी ह्या जन्मी भरभरून चित्र काढणार … हे पुर्वीच ठरवले. कामाची गरज कायम होती त्यामुळे खंड पडला नाही. खूप काम करते. चित्रांशी निगडीत काहीतरी नवे प्रयोग करते. आतावेळच उरत नाही आणि डोक्यातील कॉम्पोझीनश काही संपत नाही. बास झाले ! आता पुढच्या जन्मी अभिनेत्री .. नृत्यांगना होईन आणि नव्याने जग गाजवेन ह्या विचाराने मन मागे वळत नाही. स्वप्न पहायला काय हरकत आहे. हो आणि तेव्हा चित्र रचना आठवत नसली तरी हा जड झालेला मेंदू .. हे आठवत नसले तरी साठवणीतले असणार हे नक्की. पुण्याचं ते.
एखादी व्यक्ती आपल्याला ओढ लावून जाते ते ही ठरलेलं. एखादी दुरूनही नकोशी होते. सतत प्रयत्न करूनही एखाद्याशी जोडलेले तार कित्येक वर्ष तुटत नाहीत. खूप धडपड करूनही कधी कधी दोन जीव एकमेकांसाठी झुरत राहतात.
मागचं काही राहीलय .. ती पुर्वी बांधलेली गाठ .. गुंतागुंत सुटत नाही तोवर ती साथ सोबत राहते. मग मैत्री का असेना. ते नातं काही ठराविक काळापरियंत टिकते. मग अगदी पाण्यात साखर विरगळावी तसे नाते आपापल्या जगण्यात विरघळून जाते. प्रत्येक मैत्रीत असे होते. सोबतचे कर्म ..तोवर आपली सोबत. जगण्याचे .. नात्यांचेही हेच आहे.
एखादी व्यक्ती आपल्याला खूप सुख देते .. अगदी नाते नसूनही. तर एखादी घरचीच व्यक्ती सतत रडवते. एखाद्यावर जीव ओवाळासा वाटतो पण ती साथ टिकत नाही. म्हणतात ना .. खरं प्रेम सर्वांच्या नशीबात नसते ते खरंय …तरी जे आपलं ते ओळखता आले पाहीजे.
सतत नवननव्या भेटीगाठी होत असतात आणि कधीतरी अगदी जुनी ओळख असल्या सारखे अचंबीत करतात. त्यातील आपली माणसं ओळखता आले पाहीजे.
मध्यंतरी क्रीस्टल थेरपीचा सविस्तर अभ्यास करताना एंजलोथेरपीची तोंडओळख झाली. श्रद्धा, विश्वास, सकारात्मक विचार , ध्यानधारणा ह्यावर केला जाणारा हा अभ्यास सर्वांच्या अवतीभवती एंजल वावरत असतात ह्या विचारांवर विश्वास ठेवायला भाग पाडतात. सहावा इंद्रिय म्हणजे सिक्स सेंस जागृती हे वेगळ्या शब्दात ऐंजलच. एक मदतीचा हात मागितला की बरेच हात पुढे येतात हे देखील सतकर्मांवर आधारलेले असते.
समाजाचे काही देणे असते. ते करत राहीले की जगण्यातील गुंता मोकळा होण्याच्या वाटेकडे निघतो. ह्याचा अर्थ कमवा व समाजासाठी गमवा असे मुळीच नाही.
आम्ही कलाकार … चित्रकार चित्र विक्रीसाठी आयुष्यभर धडपडतो. आम्हाला इतर नोकरदारांप्रमाणे महिन्यांचा पगार व आयुष्याला आधार पेंशन कधीच मिळत नाही. मग समाजाचे देणे म्हणून कित्येक कलाकार चॅरिटी शो मध्ये चित्र विक्रीची अर्धी रक्कम डोनेट करतात. मागील काही वर्षात महाराष्ट्रातील कित्येक कलाकिरांनी छोट्या चित्रांची मोठी प्रदर्शने भरवून पुरग्रस्थांना लाखोंची मदतही केली.
माणूस मेला .. तो सुटतो .. मोकळा होतो. आपण रडतो .. आंदळाआपट करतो … दु:ख व्यक्त करतो ते त्याला जाताना दिसते म्हणतात. तो जीव अगदी बॅग भरून प्रवासाला निघावे असा तयारीत असतो आणि वळून न पहावे ह्या विचारात नव्याने सुरूवात करतो. किती सुंदर आहे नं ‘ मरण ‘. मग का घाबरावे ? का नाही सर्व भोग संपवून मरणाला कवटाळून निघून जावे….
आत्महत्या हा जीवन संपवण्याचा कधीच पर्याय नाही.कारण जीव जाण्याची वेळ नसताना स्वत:च्या शरिराला इजा करून श्वास थांबवणं म्हणजे आत्महत्या. तो तेथेच गेलेल्या ठिकाणी त्याची ठरलेली वेळ येइपरियंत घुटमळत राहतो. प्रत्येक दु:खाचे संघर्षाचे काही शेवट असतात आणि सकारात्मक जगण्याने ते मार्गही सोपे होत जातात.
गीतेत एक भाग ‘ पुनर्जन्म ‘ Rebirth वर आधारलेला आहे. खूप सुंदर उदाहरण देऊन त्यात जन्म जन्माची व कर्माची बेरीज वजाबाकी मांडली आहे.
गिते मध्ये दिल्या प्रमाणे थोडक्यात सांगायचे तर प्रत्येक प्राण्याला पुढचा जन्म निवडायची मुभा प्राप्त होते. एखादी गरीब व्यक्ती सतत कष्ट करून व इतरांकडून दुर्लक्षित असं संपूर्ण आयुष्य जगली असेल आणि मरताना इच्छा असेल की पुढचा जन्म अगदी ऐशोआरामात एखाद्या राजाप्रमाणे जगायला मिळावे….
तेथे देवही तथास्तू म्हणतो. पण त्याच्या पुर्व कर्माच्या आधारावर तो नवा जन्म मिळतो. कर्मच खास नसतील तर उदा. राजघराण्यातील मांजरीचा जन्मही मिळू शकतो. जेथे काही काम न करता आयुष्यभर अगदी ऐशोआरामात लोळत पडून तो जीवन व्यतीत करतो.
आहे की नै मजेशीर … जे इतरांना दिलय तेच वेगळ्या रूपात फिरून आपल्या कडे येतं.
भागवत गीता मनुष्याला सकारात्मक जगण्याकडे वळवते हे नक्की.
……. Bhavna Sonawane.8.August. 2022