संवेदनशील चित्रकार
नुकतीच अतिशय वाईट घटना कानावर पडली.
मुलाची आई एक संवेदनशील चित्रकार आहे. ह्या दुःखातून बाहेर पडायला तिला न जाणे किती दिवस लागतील.
फरीदाबाद येथील एका प्रतिष्ठीत शाळेत दहावी वर्गात शिकणाऱ्या एका मुलाची शाळेतील इतर मुलांकडून सतत छेड काढली जात होती. कारण काय तर तो बोटांना नेलपेंट लावत असे. सतत त्या मुलाला काही विशिष्ठ शब्द वापरून हिणवले जाते होते. त्या शालेय मुलांची मजल त्या बिचाऱ्या मुलाला शारिरीक / लैंगीक इजा करण्या पर्यंत गेली. हे सर्व सहन न झाल्या मुळे त्या मुलाने पंधराव्या मजल्यावरून उडी टाकून आत्महत्या केली.
आई एक चित्रकार आहे व त्याला बालपणापासून एकटीनेच संभाळून लहानाचे मोठे केले.
मुळात तृतीय पंथी ही जमात… तसेच समलिंगी… मग ती गे असो वा लेसबीयन .. हे समाजात वावरणाऱ्या लोकांपैकी काही अपवाद असतात. पण ती ही माणसंच की. शरीर रचना सारखीच… भावना ही सारख्याच. तरी काहीसे वेगळे.
प्रत्येक स्त्रीमध्ये कमी अधिक मात्रेत एक पुरुष लपलेला असतो. तसेच प्रत्येक पुरुषात कमी अधिक प्रमाणात स्त्री असते.
हा खेळ testosteron estrogen चा असतो. पुरुषांमध्ये testosteron नीट प्रमाणात असतो तर स्त्रियांमध्ये estrogen अधिक प्रमाणात बनते.
एखादा पुरुष अधीक संवेदनशील असेल तर नक्कीच इस्ट्रोजेनचे प्रमाण वाढीव असते तसेच साहजीकच नव्या जगातील ह्या स्त्रियांमध्ये टेस्टोस्टेरोन अधीक प्रमाणात असते .. पण असेना… त्यात काही नुकसान नाही.
एखाद्या पुरुषाला भांडी घासायला आवडत असतील किंवा एखाद्या स्त्रिला पुरुषांच्या बरोबरीने काम करायला आवडत असेल तर त्यात काय बिघडले?
पुर्वी रूढी परंपरा यांना अतिशय महत्त्व देताना ह्या विषयी मनात अनेक प्रश्न असायचे. पण मुंबई लोकल ट्रेनचा प्रवास करताना व हायवेवर टाळ्या वाजवत ही माणसं दिसायची व मनातील प्रश्न काहीसे कमी झाले.
तृतीय पंथियांना समाजात जी काही वागणूक दिली जाते त्यातून जिवंत राहण्यासाठी आपल्याला भितीदायक ठरणारे मार्ग ते अवलंबत असावेत. खरं सांगायचे तर ते सजून त्यांच्या झोपडी बाहेर पडतात ते एखाद्या स्त्रिला लाजवेल इतके सुंदर दिसतात. मग मुंबईच्या हाय क्लास एरियातील ह्या छक्यांना पहायचे…
कॉलेजला जाऊ लागले तेव्हा एखाद्या मुलामधील मुलीसारखं लाजणं… नाक मुरडणं दिसलं तेव्हा हसू यायचे. ते हसणे एखाद्या मस्तीखोर बाळाला पाहिल्यावर असणाऱ्या हसू प्रमाणेच असायचे. पण अशा गे मित्रात एखाद्या मुलीने मित्र शोधावा… जन्मभर मैत्री अटूट राहते.
पुढे परदेशी आर्ट रेसीडेंसीच्या काळास माझ्याच इमारतीत वरच्या मजल्यावर एक भारतीय मुलगी राहत होती. तिने मला लवकरच सांगितले की ती लेसबीयन आहे व तिला एक गर्लफ्रेंडही आहे. तरी आमच्या मैत्रीत काहीही फरक पडला नाही. माझ्यासाठी ती इतर मैत्रिणींप्रमाणेच होती…
काही वर्षांपुर्वी माझ्या जुन्या स्टुडीओत टाळ्या वाजवत एक छक्का यायचा. सेठ किधर है… सेठ को बुलाओ सांगायचा. अनिश असेल तर त्याच्या हातून तो देईल ते पैसे घेऊन दुआ देऊन जायचा. तो आत नाही हे सांगितले तर मी जणू खोटं बोलतेय असे माझ्यावर डाफरत असे. अधूनमधून त्याची टोळी घेऊन यायचा आणि दाराबाहेर बसून चहा-पाण्याची मागणीही करायचा. घरच्यांनी पुर्वीपासून घाबरवलंय म्हणून कधी त्यांच्याशी बोलत बसले नाही. एकदा मी स्कुटीवर रस्त्यात उभी असता तो छक्का समोरून पैसे मागत गेला पण मला ओळख दाखवली नाही.
असेच काही वर्षांपुर्वी अगदी गोरा उंच मुलगा… शाळेतील गणवेशात ट्रेन मध्ये क्लीपा विकत असे. खूप बडबड असायची त्याची आणि हालचाल थोडीशी नाजूकच. काही महिने सरले आणि त्याच्या बोटांच्या वाढलेल्या नखांना रंगीत नेलपेंट दिसू लागले. आता तो अधीकच मटकत चालत असे. ते वर्ष सरलं तसे एकदा पुन्हा दिसला… तेव्हा एका फेरीवाली मैत्रिणीशी बोलताना मानेची हालचाल व अधूनमधून वाजणाऱ्या टाळ्या…
सहज पण किती सुटसुटीत जगतात ही माणसं… आपल्याच नादात. न लग्नाची गाठ… न पोरंबाळं पैदा करण्याची काळजी…
ते तसे.. आपल्यापेक्षा निराळे म्हणून आपल्यातील काहींना वाईट वाटते… पण मला ते सर्वच आपल्यापेक्षा अधिक सुखी वाटत आले आहेत.
पण फरीदाबादची काल-परवाची ही घटना मनाला छेद करून गेली. शाळकरी पोरांना कसे काय कळतात हे लैंगिक छळ? कुठून शिकली असतील ती मुलं असं वागायला?
बरं… शाळेने त्यांची पाठराखण करून ह्या बिचाऱ्या गरीब मुलाला असे छळायला नको होते. बिचाऱ्याला जीव गमवावा लागला. जीवन खरंच एवढे स्वस्त झाले आहे का?