स्पर्शज्ञान ब्रेल दिवाळी अंक 2021 मधील माझ्या बालपणीतील आठवणींवर छापून आलेला लेख….
लहानपणी जोगेश्वरी व अंधेरी येथे खूप फिरणं झालं .. कधी घराच्या अगदी जवळच्या जंगल परिसरात तर कधी स्कुटर गाडीनेच गावांचा लांबचा पल्ला. नॅशनल पार्क व आरे कॉलॉनी येथील ड्राईव, आनंद अपार्टमेंट (अंधेरी) बिलडींगची पिक्नीक व पाण्याच्या टाकीवर बसून काढलेला आम्हा चौघांचा फोटो, सोलापूरचा गड्डा येथील फोटो स्टुडीओ , त्यात आमचं कुटूंब जोडून ठेवणारी महत्वाची साथीदार विजय सुपर स्कुटरचा फोटो नाही ..ते पुन्हा कधीतरी ..
निसर्ग, चित्रं, मी वगैरे:
निसर्ग नेहमीच आपल्याला भरभरून देत असतो. घरात छोट्याशा कुंडीत जगणारं इवलंसं रोपसुद्धा आपल्याला खूप सुख–समाधान देत आपल्या आयुष्याचा भाग बनलेलं असतं. निसर्गाच्या सान्निध्यातल्या एखाद्याच्या बालपणीच्या आठवणी त्याचं पुढील खडतर आयुष्य सुखकर बनवण्यास साथ देतात.
माझ्याकडेही लहानपणीच्या अशाच काही सुंदर आठवणी आहेत. स्कूटरवरून भटकण्याच्या. आमची ‘विजयसुपर’ आणि आम्ही चौघे–बाबा, माँ, मी व माझा लहान भाऊ अनिरुद्ध. मी पहिलीत शिकत होते. तेव्हा आम्ही राहायला होतो जोगेश्वरी, काळूराम दुबे चाळ, शामनगर इथे. मुंबईतली टिपिकल मराठी वस्ती. तिथे सकाळी सकाळी पाण्यावरून कोणी ना कोणी भांडत असायचं. मला ठळक आठवतं तो बटाट्याच्या भाजीचा विशिष्ट वास. जेवणाच्या वेळेला आजूबाजूच्या घरांतून हमखास यायचा. कुणाच्याही घरी नवा टी.व्ही., टेपरेकॉर्डर किंवा कोणतीही नवी वस्तू आली तरी आख्ख्या चाळीला कळत असे. शनिवार–रविवार संध्याकाळी चाळ शांत, सुनसान होत असे. कारण सगळी मंडळी एकत्र जमून दूरदर्शनवर चित्रपट पाहण्याचा आनंद घेत असायची. बाबा झुओलॉजीचे अध्यापक होते तर माँ फिजिक्सची अध्यापिका. सोमवार ते शनिवार ते दोघेही स्कूटरवरून सकाळी सकाळीच कॉलेजसाठी निघायचे. आजही आठवतं::: लिमलेटच्या गोळ्यांसाठी गाठायचो ते दुकान, हापशीवरून पाणी भरणारे, गल्लीत ये–जा करणारे बायका व पुरुष. शेजारच्या घरातला एक म्हातारा पाणी भरून रोज घर धुऊन काढायचा. मग पाणी वाया घालवतो म्हणून त्याला कुणी बोललं की भांडत बसायचा. बबलूताई आणि सरिताताई आमच्या मोलकरणीच्या मुली. त्या आल्या की शाळेत जाण्यासाठी आमची तयारी करून द्यायच्या. आम्हाला शाळेत सोडायला मात्र त्यांचा भाऊ सुरेश यायचा. तो तेव्हा सहावी–सातवीला शिकत असावा. घरापासून शाळेपर्यंत पायी चालत जायला लागायचं. साधारण पंधरा मिनिटं लागायची. रस्त्याने जाताना मध्ये एक नाला लागायचा. त्यावरून पायी चालण्याकरता कच्चा लाकडी पूल होता. पावसाच्या दिवसांत त्यावरून चालताना खूप भीती वाटत असे. दप्तर, रेनकोट सांभाळत चालताना त्या तुडुंब भरलेल्या नाल्यात पडलो तर काय होईल, असं वाटायचं.
त्या पाण्याला घाण वास यायचा. आज कधी अशा प्रकारचा वास आला की आपोआप तो ब्रिज आणि त्यावरून दप्तर, रेनकोट सावरत चालणारी आमची छोटी जोडगोळी आठवते.
मी साधारण सात वर्षांची असताना आम्ही अंधेरी, लिंक रोड इथे ‘मॉडेल टाऊन’मध्ये राहायला गेलो. ही श्रीमंत लोकांची वस्ती होती. इथे एक स्वतंत्र बागही होती. पण इथे चाळीतल्यासारखं आमची काळजी घ्यायला कुणी रिकामं नव्हतं. चाळीतला मोकळेपणा नव्हता. कायम बंदिस्त, एकलकोंडेपणा जाणवायचा. सकाळी कसंबसं जेवण बनवून माँ–बाबा कामाला जायचे आणि त्यानंतर घर एकदम रिकामं, शांत वाटायचं. मी आणि पाच वर्षांचा अनिरुद्ध आम्ही दोघेच एकटे; बाहेरून कुलूप लावलेल्या फ्लॅटमध्ये दिवसभर भातुकली आणि चोर–पोलीस खेळत स्वत:ला रमवायचो. अनिरुद्ध लहान आणि खूप मस्तीखोर होता. त्यामुळे त्याला दिवसभर सांभाळताना मला अगदी नकोनकोसं होत असे. मग जितकं प्रेमाने खेळायचो, तितकंच एकमेकांशी भांडायचो. पुठ्ठ्यांची घरं बांधणं, त्यात बाहुल्या नाचवणं तर कधी चादरीचा पसारा बाहेर काढून घर बांधणं हे आमचे दोघांचेही आवडते खेळ. सोमवार ते शनिवार अशा पद्धतीने घरी खेळ आणि शाळा यांमध्ये दिवस निघून जायचे. पण रविवार उजाडला की सकाळी लवकर उठून, तयारी करून माँ–बाबांसोबत विजयसुपर स्कूटरवरून आरे कॉलनीत फिरायला जायचे वेध लागायचे.
महाकाली गुफांच्या रस्त्यावरून पुढे डोंगर, जंगल लागायचं. तिथे वारा वेगळा जाणवायचा. थंड आणि स्वच्छ! आजूबाजूला बरेच गायी–म्हशींचे गोठे होते. बरीचशी भैया लोकांची वस्ती होती. त्यांच्या बायकांच्या भडक रंगाच्या साड्या, डोक्यावर पदर आणि भांगेमध्ये भरलेलं अतिशय सुंदर लाल आणि केशरी रंगांमधील छटा असलेलं सिंदूर आकर्षक दिसायचं. मला त्यांची भाषाही मजेशीर वाटायची.
त्या मंदिराच्या अगदी समोरच शिल्पकार शिरगावकरांचा स्टुडिओ होता. आजही आहे. खूप मोठमोठी शिल्पं त्या रस्त्यावरून जाताना दिसत असत. ‘महाकाली गुंफा’ हे खूप जुनं, प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेलं मुंबईतलं ठिकाण आहे. इथून डाव्या वळणाने आमची ‘विजयसुपर’ सुसाट धाव घ्यायची. माझे केस बॉयकट असायचे, बरेचदा मुलांसारखे टी–शर्ट आणि पॅन्ट घातलेली मी स्कूटरवर पुढे उभी राह्यचे. अनिरुद्ध व माँ क्रमाने बाबांच्या मागे बसायचे. त्यामुळे, तो वारा झेलायचे नशीब मला लाभायचे बरे!
त्या गुफांच्या डाव्या वळणाला अगदी पाचव्या मिनिटाला कमाल अमरोहींचा ‘कमलिस्तान स्टुडिओ’ आहे. इथे असंख्य बॉलिवूड ब्लॉकबस्टर फिल्म्स तयार झाल्या आहेत. मीनाकुमारी व कमाल अमरोहींच्या जीवनाचा महत्त्वाचा इतिहासही त्या स्टुडिओला लाभला आहे. कित्येकदा माँकडून मनोरंजन क्षेत्रातले ते जुने किस्से, कहाण्या ऐकायला मिळायच्या. एखाद्या व्यक्तीचं जीवन आणि मृत्यू त्याच्या जोडीदाराच्या आयुष्याला कशी कलाटणी देऊ शकतं, याचं उत्तम उदाहरण म्हणजे मीना कुमारी आणि कमाल अमरोही यांची कहाणी आहे. कधीतरी तिथे एखाद्या चित्रपटाचं शूटिंग पहायचा योगही येत असे.
पुढे बऱ्याचदा रस्ता मोकळा असायचा. लांबवर दिसणाऱ्या डोंगरवाटा, घनदाट झाडी पाहताना आठवड्याचे सहा दिवस आपण शहरातल्या बंदिस्त वातावरणात शाळा आणि घर हा खेळ खेळत असतो याचा विसर पडलेला असायचा. वाटेत कुठे पांढऱ्या शुभ्र फुलांचा सडा पडलेला असायचा तर कधी त्या काळ्या रस्त्यावर मोहवून टाकणारी लालकेशरी गुलमोहराची निसर्गनिर्मित रांगोळी घातलेली असायची. कधी झाडांच्या फांद्या खालपर्यंत झुलत असायच्या आणि मग त्या फुलांनी बहरलेले गुच्छ तोडून घ्यायला आम्ही दोघे पळत सुटायचो.
मला आठवतंय::: एका बसस्टॉपवर ‘मॉडर्न ब्रेड’च्या पाकिटाचं मोठं डिझाइन केलेलं होतं. म्हणजे बारा–पंधरा फूट लांबीचा लाकडाचा ब्रेडचा पुडा. तो बसटॉप लांबूनच दिसायचा आणि आपण ‘आरे कॉलनी’त आहोत हे लक्षात यायचं.
त्यापुढे आरे कॉलनीतली छोटीशी बाग आणि मग नॅशनल पार्कला जोडरस्ता लागायचा. जेवणाच्या वेळेपर्यंत आम्ही घरी परतायला निघायचो. आइस्क्रीम किंवा फास्टफूडची सोय तेव्हा नव्हती. त्यामुळे पिकनिकची व्याख्या एवढीच होती. मग तिथूनच यू–टर्न घेतला जायचा. त्याआधी आम्ही गोळा केलेल्या फुलं—पानं–फांद्यांनी संपूर्ण स्कूटर सजवायचो. उरलेली फुलं दोघे ओंजळीत धरून ठेवायचो. घरी पोहोचलो की काही फुलं फुलदाणीत, तांब्यात, पेल्यात सजवून ठेवायचो. उरलेला दिवस ती फुलं न्याहाळण्यात जायचा. दुसऱ्या दिवशी फुलं कोमेजलेली असायची आणि त्याचा खूप त्रास व्हायचा. असं वाटायचं, रविवार संपला तरी चालेल पण ही फुलं कोमेजू नयेत. त्यांचा टवटवीतपणा जणू आपलं जगणं सुंदर बनवतो, तो हातातून निसटू नये असं वाटायचं.
मी साधारण दहा वर्षांची असताना आम्ही महाकाली रोडवरच्या ‘आनंद अपार्टमेंट’मध्ये राहायला गेलो. चाळीतलं घर ते वन–बी.एच.के. असलेलं हे घर म्हणजे माझ्या माँ–बाबांचं मुंबईत स्वकमाईने घेतलेलं आणि लग्नानंतर बदललेलं सहावं घर होतं. या घराला दोन छोट्या बाल्कनी होत्या. आजही आहेत. अवतीभोवती सर्वत्र हिरवळ असलेला हा परिसर पावसाळ्यात खूप छान दिसत असे. बाल्कनीत लावण्यासाठी बाबा शोभेची छोटी छोटी रोपं निवडून आणायचे. आणि आम्ही दोघे त्यांचे असिस्टंट त्यांच्या मागे मागे झुडुपांत घुसून छान छान रोपं घेऊन यायचो. मला आठवतंय तिथे मातीत लाल–काळ्या बिया पडलेल्या असायच्या. अतिशय सुंदर दिसायच्या. गुंजेच्या झाडाची ओळख अशी तिथेच झाली. त्यापूर्वी इतकं सुंदर, नाजूक बी मी कधीही पाहिलं नव्हतं. गुंजांची पानं अगदी चिंचेच्या पानांसारखी दिसतात. चिंचेच्या पानांची चव आंबट तर गुंजांच्या पानांची चव मधुर. हे मला खूप नवल वाटायचं. आजही गुंजांच्या पानांची ती गोड चव माझ्या जिभेवर रेंगाळतेय.
आज मागे वळून पाहताना लक्षात येतं की या निसर्गाने मला घडवलंय. माझ्या कलेने मला आज ज्या उंचीवर पोहोचवले आहे; त्यामध्ये निसर्गाचा वाटाही मोठा आहे. लहानपणापासून जर अशा रीतीने निसर्ग भरभरून पहायला–अनुभवायला मिळाला नसता, या आठवणी नसत्या तर कदाचित माझ्या चित्रांचे विषय वेगळे असते आणि न जाणो मी माझ्या चित्रांच्या प्रेमात किती असते?