एकतर कलाकारांना त्यांच्या कलेमुळे लक्षात ठेवण्याची माझी सवय..
एकतर कलाकारांना त्यांच्या कलेमुळे लक्षात ठेवण्याची माझी सवय. कलाकारांना भेटणे शक्य होइल तितके टाळायचे आणि विशिष्ठ कलाकाराचे काम मनापासून आवडत असूनही त्या कलाकाराला ओळखत नसल्यामुळे होणारी माझी फजिती तशी काही नवीन नाही.
कधीतरी पुर्वी दोनतीन वेळा एका चित्रकाराचे काम पहावे ..सिनीयर आर्टिस्ट व छान काम हे कुठेतरी डोक्यात साठून रहावे मग कालांतराने फेसबूकवर तो चित्रकार समोर असावा आणि अरे त्याच नावाचा हा कोण नवीन चित्रकार म्हणत असताना लक्षात यावे की आपण ज्याला बुजूर्ग कलाकार समजत होतो हा तोच आहे .. साधारण बेचाळीस ..त्रेचाळीसीचा चित्रकार अनिल गायकवाड.
अनिलजीं सोबत माझी ओळख अशीच फेसबूकवर झाली पण त्यांचे एखाद दुसरे चित्र सिनीयर कलाकारांच्या चित्रप्रदर्शनात पाहिल्याचे आणि एका प्रायवेट लायब्ररीत संपुर्ण कॅटेलॉग चाळल्याचे आठवतय. सवयीप्रमाणे चित्र व नावच लक्षात राहिले. त्यामुळे त्यांचे चित्र समोर घडताना पाहण्याआधी हेच का ते गायक्वाड हे काही सुचलेच नाही.
चिखलदराला एका आर्ट कॅम्पमध्ये त्यांचे एक चित्र घडताना पाहिले. मी आत काम करत होते अन् थंडी असल्यामुळे थोडावेळ ऊन्हाकरिता आंगणात येऊन बसत. समोरच एक कॅनव्हास जग जग भरून रंगांच्या थरांनी धुतला जाऊ लागला होता.. दोनचार जग व लहान बादली भरून रंगाचे वेगवेगळे फ्लो सुटत होते . माझ्या कामाची पद्धत वेगळी असल्यामुळे मी सहसा इतरांचे फ्लो निरखून पहायचे टाळते. मला रंगांसाठी एक जग पुरेसा असतो ..ते ही स्वच्छ नितळ असेपरियंत. मग असे रंगानी घट्ट झालेले पाणि पाहिले की हातांचा थरकाप होऊ लागतो व इतरांचे काम पाहत उभे राहिले की इनस्पायर सॉर्ट आॅफ मला काही नवे सुचू लागते आणि मग माझा कॅनव्हास माझाच असतो पण भल्तीकडे भरकटत फिरतो आणि परत जागेवर आणणे कठीण होऊन बसते. मग आर्ट कॅम्प म्हट्ले की वेळेत काम अपेक्षित असते. त्यामुळे अशा वेळेस अती बोलके किंवा अती बोअर काम मला रूचतच नसे.
साधारण नव्हेंबर महिना असावा. आम्ही साधारण चोवीस चित्रकार असू. चिखलदरा अतिशय निसर्गरम्य अगदी नो पोल्यूशन ठिकाण.जुना बाजार, कमी गर्दी. ज्या हॉटेल मध्ये रहायची सोय होती तेथील खालच्या मजल्यावर एका बाजूला आमची जेवणाची तर बाहेरच्या मोठ्या हॉलमध्ये कामाची सोय होती.
अधून मधून ठंडीची लाट येत होती. दिशसभर स्वेटर जवळ घेऊनच कामाला बसायची. दुपारचे काही तास थंडी नसत. बाकी वेळ बोचरी थंठी असायची. तेथे सेजल सोबत ओळख झालेली अन् वावर एकत्रच असे. सेजल तेथे व्यवस्थापनात वडिलांना मदत करत असे. आमची छान मैत्री झालेली. एकत्र राहणे, एकत्र फिरणे, पहाटे वॉकला एकत्र जाणे वगैरे मी आणि सेजल सोबत असायचो. सकाळी समोरच्या टपरीवर चहा घ्यायचा आणि थोडे फिरून कामाला बसायचे. मग नाष्ता जेवण वगैरे वेळोवेळी होत असे.
मी हॉलमध्ये काम करत होते एक कॅनव्हास सुरू केला होता अन् आजूबाजूचे वातावरण बोअर करत होते मग काही वेळ रसत्याकडे येऊन तेथे बसलेल्या चित्रकारांसोबत गप्पा … नाही नाही … त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची… बास…बरेचसे चित्रकार वयाने मोठे होते अन् मला उगाच त्याच्यात बडबड करू नको असेही सांगितले गेले होते.
तरी मी आणि सेजल शांत काम न करता काहीतरी गप्पा सुरू असायच्या.
अनिल गायकवाड बाहेर एन्ट्रीकडील एका बाजूला कॅनव्हासवर अधूनमधून रंग ओतत असायचे. पुन्हा एकटक त्या कॅनव्हास ला पाहत बसायचे. कधी पाण्यांचे ओघळ सोडायचे. असाच एक कॅनव्हास जवळजवळ पुर्ण झाला होता. सुरूवातीला भगभकीत निळा थर ..म्हट्लं हे काय इतकं भडक … डोळ्यात जाणारा रंग … पण हळू हळू टप्प्या टप्पयाने चित्र पुढे सरकू लागले. थर वर थर चढत होते. कधी पातळ ..कधी जाड .. एकमेकांत गुंफून आधीपेक्षा वेगळे काही तयार होऊ लागले. नवे पण आधिचे त्या नव्या आड लपलेलेही डोकावत होते आणि चित्रामध्ये नवे आकार जन्म घेत होते.
मी आत हॉलमध्ये काम करत होते. एक दिवस थंडीत कुडकूडत काम केले. मग सरळ कॅनव्हास सकाळी थोडा वेळ आत , मग कोवळ्या उन्हात बाहेर, पुन्हा ऊन वाढले की आत आणि दुपारनंतर तासभर बाहेर .. असे नाचवत काम करत होते. आत असले की इयरफोनवर गाण्यांची साथ व बाहेर आले की एक भला मोठा निळा कॅनव्हास पाहत माझे काम करत होते जो दर तासातासाला वेगळा आढळत होता. आणि अशाच पद्धतिने ऐक एक ओघळ जमा होत ते भव्य खडक आणि त्यातून वाहणार्या धबधब्याप्रमाणे पाण्याच्या प्रवाह जाणवणारे चित्र तयार होते.
एखादा कलाकार त्याच्या आयुष्याप्रमाणे प्रत्येक चित्र जगत असतो. त्याला त्याच्या अभ्यासाची साथ शेवटपरियंत दिशा दाखवत असते. कलेचा अपुर्ण अभ्यास बर्याचदा कलाकाराला भरकटायला भाग पाडतात. पण चित्र मुर्त असो वा अमुर्त , संपुर्ण अभ्यासरूपी चित्र कळत नकळत आपल्याला वाचायला भाग पाडते. मग ते चित्र सहजासजी मेंदूतून निसटून जाणे कठीण होऊन बसते. अनिलजींच्या चित्रांचेही असेच काहीसे आहे.
त्यांनी आजवर विवीध माध्यमात काम केले आहे. सिरॅमिक, लाकूड, फायबर, पेपर मॅशे इ जसे मनामध्ये एकस्प्रेशन येतात .. नवे काही सुचते तसे माध्यम निवडायचे. स्वत:ला एका बंधनात अडकवून ठेवायचे नाही तर नवेनवे काही हाताळायचे. आणि हे नवे नक्कीच पहिल्यापेक्षा वेगळे असेल.
अनिलजींची पेस्टल त्यांच्या अॅक्रेलीक पेक्षा वेगळी आहेत तर शिल्प त्याहून वेगळी जाणवतात.
एखादी कलाकृती त्या विशिष्ठ कलाकाराची खास शैली असते तर त्याच्या इतर कलाकृती त्या शैलीला अधीक महत्वपुर्ण आणि पुरक बनवतात असे ते म्हणतात. त्यामुळे काम करत रहायचे. कधी काय काम विकले जाईल तसेच काम सतत न करता आपल्या विचारांप्रमाणे, भावनांप्रमाणे माध्यम निवडावे. त्या माध्यमाचे तंत्र शिकावे आणि मगच आपली कला त्यात व्यक्त करावी. मग आपण निर्माण करत असलेली प्रत्येक कलाकृती एकमेकांना पुरक असेल. कलाकाराने समाजात वावरताना स्वत:बद्दल महानतेच्या गैरसमजूती ठेवू नयेत. त्याचे विचार जरी इतरांपेक्षा वेगळे असले तरी तो समाजाचा अंग असून स्वत:ला त्यातून वेगळे काढू नये असे ते म्हणत. ते बोलू लागले की भाषेवर, शब्दांवर आणि कला अभ्यासावर प्रभुत्व असल्याचे प्रकर्षाने जाणवत राहते.
एका बाजूला असे ततात्विक अनुभव व दुसर्या बाजूला आपले जगण्यातील धडपड ..दु:ख सर्वच दूर सारत अगदी लहान होऊन धम्माल वातावरण तयार झाले होते. अगदी म्युझीक आणि गाण्यांसकट चित्र एन्जॉय केलेली ही एक टूर.